Breaking News

दारूविक्री अड्ड्यांवर धाडसत्र

लाखोंचा मुद्देमाल जप्त; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

अलिबाग : रामप्रहर वृत्त – कोरोना (कोव्हीड-19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील सर्व परवाना धारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करणे बाबत आदेश पारित केले आहेत. तथापि काही समाज विघातक घटक याआदेशांची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पध्दतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती मिळत होती. त्यामुळे अशाप्रकारे छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करणेचे आदेश पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना दिले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 27 मार्चला मौजे खांदाड-माणगाव मौजे धाटाव-रोहा आणि कर्जत या ठिकाणी शासनाने पारित केलेल्या सर्व आदेशांचे जाणीव पुर्वक उल्लंघन करुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता देशी-विदेशी दारुची अवैधरित्या विक्री करणार्‍या नऊ व्यक्तींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकुण 41,488 रुपये किमतीचा प्रोव्हीबेशनचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तसेच 28 मार्च पाली येथील साई गणेश बार आणि मौजे पराडे-खालापूर येथे छापा कारवाई करुन देशी-विदेशी दारुची अवैधरित्या विक्री करणार्‍या सात व्यक्तींना ताब्यात घेवून एकुण 50,876 रुपये किमतीचा प्रोव्हीबेशनचा मुद्देमाल जप्त केला होता.

तीच मालिका पुढे सुरु ठेवून 2 एप्रिलला अनुक्रमे मौजे मुरुड-कोळीवाडा आणि मौजे डोलवी-वडखळ या ठिकाणी छापे घालून शासनाने पारित केलेल्या सर्व आदेशांचे जाणीव पुर्वक उल्लंघन करुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता देशी-विदेशी दारुची अवैधरित्या विक्री करणार्‍या  दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून या संपुर्ण कारवाईत एकुण 42,920 रुपये किमतींचा प्रोव्हीबेशनचा मुद्देमाल जप्त करुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड सत्राची श्रुखंला पुढे कायम ठेवली आहे.

त्यामध्ये मौजे मुरुड-कोळीवाडा येथे छापा कारवाई करुन बबन पांडुरंग सुर्वे (रा.मुरुड-कोळीवाडा) यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील 12,520 रुपये किमतीची देशी-विदेशी दारु जप्त केली असून या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मौजे डोलवी-वडखळ येथे छापा कारवाई करुन नितीकेत कृष्णा पाटील (रा.डोलवी- वडखळ ता.पेण) यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील 30,400 रुपये किमतीची विदेशी दारु जप्त केली असून या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही छापा कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनानूसार व अपर पोलीस अधीक्षक सचीन गुंजाळ यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, सहाय्यक फौजदार सी. बी. पाटील आणि पोलीस हवालदार सुभाष पाटील आणि त्यांचे पथकाने केली आहे.

तत्काळ माहिती देण्याचे आवाहन

कारवाईच्या माध्यमातून अशा आणीबाणीच्या प्रसंगी शासनाने पारित केलेल्या आदेशांची जाणीव पुर्वक पायमल्ली करुन आपल्या नजीकच्या परिसरात छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या देशी-विदेशी दारु, गांजा, चरस व इतर अमली पदार्थांच्या विक्रेत्यांबाबत माहिती असल्यास/मिळाल्यास तत्काळ त्याबाबतची माहिती देण्याचे नागरिकांना रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply