Breaking News

कोरोनाचा मळेवाल्यांना फटका

लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे नुकसान; उरणमध्ये शेतकर्‍यांवर उपासमारीचे संकट

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधव पावसाळ्यातील भातशेतीच्या हंगामानंतर भातशेतीला पूरक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात, परंतु भाजीपाल्याच्या हंगामातच कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास तयार होणार्‍या भाजीपाल्याच्या नुकसानीत हिरावला जात आहे. दोन महिने बियाणे, खत व ओषधे यांच्यात खर्च झालेली रक्कमही हातात न येता 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा फटका बसत मोठे नुकसान झाले आहे. या कष्टकरी, सामान्य व आदिवासी बांधवांना अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. उरण तालुक्यात औद्योगिकरण मोठ्या झपाट्याने होत असतानाच शेतकरी बांधव शेतीबरोबरच आपल्या उदरनिर्वाहासाठी भातशेतीला पूरक म्हणून हिवाळा व उन्हाळ्यात भाजीपाल्याची शेती करीत आहेत. यामध्ये विशेषतः उरणच्या पूर्व विभागातील कलंबुसरे, चिरनेर, विंधणे, रानसई, दिघोडे, वेशवी चिर्ले, जांभुळपाडा, पुनाडे, कोप्रोली व डोंगराच्या कडेकपारित वास्तव्यास असलेले रानसई त्याचप्रमाणे उरणच्या पश्चिम विभागातील केगाव नागाव, चाणजे आदी ठिकाणच्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. आदिवासी बांधव आपले घरदार सोडून पाण्याचा भाग शोधून भाड्याने जागा घेऊन भाजीपाल्याची शेती करीत आहेत. शिराळे, काकडी, पडवळ, दुधी आदी भाज्यांची लागवड केली जात आहे. दोन महिन्यानंतर अथक परिश्रम करून हजारो रुपये खर्च करून खत फवारणी करण्यात आली. आज भाजीला बाजही चांगल्याप्रकारे लागले आहे, परंतु आज कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे व्यापारी वर्गाकडून भाजीपाल्याला योग्य भाव दिला जात नाही. काकडीला किलोमागे 20 ते 30 रुपये मिळणारा दर आज 8 ते 10 रुपये मिळत आहे. इतर भाज्यांनाही या  पद्धतीने किलोमागे दर मिळत आहे. मात्र हीच भाजी व्यापार्‍यांकडून रिटेलमध्ये 40 ते 60 रुपये मोठ्या भावाने विकली जात आहे. मात्र भाजीपाला लागवड करणार्‍या शेतकर्‍यांवर अस्मानी आर्थिक संकट ओढविले आहे. आज मळ्याला पाणी देण्यासाठी डिझेललाही पैसे उरलेले नाहीत. खते, औषधे फवारणीला पैसे शिल्लक न राहिल्याने या शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

‘संकट उभे ठाकल्याने शासनाकडून मदत मिळावी’

खर्च केलेले पैसे आणि एवढ्या दिवसांच्या केलेल्या मेहनतीवर मोठे संकट उभे ठाकल्याने यातून बाहेर पडण्यासाठी शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी मागणी येथील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply