बाजारपेठेत प्रचंड गर्दी; पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभर व राज्यभर लॉकडाऊन असताना सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत, परंतु अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा, दूध, भाजीपाला व मेडिकल सेवांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, मात्र या अत्यावश्यक सेवांमधील साहित्य खरेदीसाठी रोहा बाजारपोठेत प्रचंड गर्दी होताना दिसत आहे.गेली दोन दिवस बाजारात खरेदीसाठी गृहिणींसह पुरुषही मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत. परिणामी रोह्यात सोशल डिस्टन्सिंगला नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे.
किराणा व भाजी खरेदीसाठी गर्दी करीत असताना या ठिकाणी नागरिक खरेदी करताना सुरक्षित अंतरही पाळत नसल्याचे दृश्य रोहा बाजारपेठेत दिसत आहे. रोहा अष्टमी नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस यंत्रणा यांच्याकडून जनजागृती करण्यात येत असतानाही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन जारी करून फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे रोह्यात भाजीपाला, फळे, किराणा, मेडिकल सेवा सुरू आहेत. 31 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान पूर्णपणे रोहा बंद ठेवण्यात आले होतेख परंतु त्यानंतर रोहा बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रोहा बाजारपेठेत भाजी, किराणा व औषधे खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.
पोलीस सातत्याने नागरिकांना गर्दी करू नये यासाठी आवाहन करीत आहेत, परंतु नागरिक तात्पुरते सुरक्षित अंतर ठेवून उभे राहतात आणि पोलीस गेल्यावर पुन्हा गर्दी करीत आहेत. दुचाकी वाहने रस्त्यावर आणण्यास मनाई असतानाही नागरिक आपल्या दुचाकीवर बसून खरेदीसाठी येताना दिसतात. पोलिसांनी काही वाहने ताब्यातही घेतली आहेत, परंतु नागरिकांना कोणताही फरक पडताना दिसत नाही. नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण व त्यांची टीम गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करीत आहे. तरीही अत्यावश्यक सेवेच्या निमित्ताने नागरिक ठिकठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.