Breaking News

चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील वणव्यांमुळे जंगलसंपत्तीचा र्हास

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात थंडीचा मोसम संपताच अनेक ठिकाणच्या जंगलांना बेसुमारपणे वणवे लावण्याचा प्रताप सुरू होत असतो. यंदाही वणव्यांची कमतरता नसून नित्यनेमाने लपून-छपून जंगलसंपत्तीचा र्‍हास करण्यासाठी समाजकंटक यशस्विता दाखवीत आहेत. उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा महामार्गावरील तलाखराच्या घाटात व घाटाच्या खाली वरच्या उजव्या बाजूला लावण्यात आलेला वणवा मागील तीन दिवसांपासून धुमसत आहे. मात्र येथील वन विभागाचे या वणव्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, त्यामुळे महामार्गावरील वृक्षे अक्षरशः होरपळून निघाली आहेत. कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 21 दिवसांचे लॉकडाऊन व जिल्हाबंदी करण्यात आल्याने या महामार्गावर वाहनांची वर्दळ अत्यंत कमी प्रमाणात आहे. परंतु भर उन्हाच्या तडाख्यात हा वणवा बेसुमारपणे लावण्यात येऊन पसार झालेल्या समाजकंटकांनी या जंगलात असलेल्या पशुपक्ष्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. गवताच्या तसेच झाडांवरील फाद्यांमध्ये विविध प्रकारच्या पक्ष्यांची अंडी तसेच पक्ष्यांची लहान पिल्ले यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. सरपटणारे प्राणी आणि इतर जंगली प्राणी यांचा रहिवासही नष्ट झाला आहे. त्यांना मुक्तपणे संचार करण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसा किंवा रात्रीच्या वेळी अचानकपणे दृष्टीस पडणारा ससा, हरीण, मोर, कोल्ह्याचा कोल्हेकुईचा आवाज आता ऐकावयास मिळत नसून दुर्मिळ झाला आहे. विविध प्रकारची औषधी वनस्पती या वणव्याने होरपळून निघाली असून, त्यांची राखरांगोळी झाली असल्याचे चित्र चिरनेर येथील टाळ तलाखराच्या घाट आणि खिंडीत पाहावयास मिळत आहे.

वनखात्याने दखल घेण्याची मागणी

तीन दिवस बेसुमारपणे महामार्गावर वणवा जळत असताना चिरनेर येथील जंगलसंपत्ती रक्षणार्थ असलेल्या वनखात्याचे वनपाल आणि कर्मचार्‍यांना एवढ्या दोन ठिकाणी किमान प्रत्येकी 80 ते 100 मीटरच्या अंतरावर लावण्यात आलेला वणव्याच्या आगीचा भडका होऊनही कसा दिसत नाही, असा सवाल या मार्गावरील पादचारी व वाहनचालक करीत आहे. या प्रकारणाची वनखात्याने अधिक गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी येथील जाणकार वन्यजीवप्रेमी करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply