कर्जत ः बातमीदार – नेरळ पोलिसांनी गावठी दारू बनविणार्या हातभट्ट्याविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बेकरे येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात एक लाख 20 हजार रुपयांची गावठी दारू पोलिसांनी उद्ध्वस्त केली.
नेरळ पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगल भागात गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी पथक नेमले. या पथकाने महितीच्या आधारे बेकरे गावाच्या जंगलात शोध घेतला असता त्यांना बेकरे गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ओहोळात गावठी हातभट्टी आढळून आली. त्या ठिकाणी नेरळ पोलिसांना 200 लिटर क्षमतेच्या 96 पत्र्याच्या व प्लास्टिकच्या टाक्या, त्यात 150 लिटरप्रमाणे 2400 लिटर एवढे नवसागरमिश्रित रसायन तसेच भट्टीवर ठेवलेल्या तीन पत्र्याच्या टाक्या असा एकूण एक लाख 20 हजार रुपयांचा गावठी दारू बनविण्याचा मुद्देमाल मिळून आला.
याबाबत नेरळ पोलिसांनी गु. र. नं. 52/2020 महाराष्ट्र दारूबंदी 1949चे अधिनियम कलम 65 (फ) 83 अन्वये तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तात्या सावजी, एएसआय ठमके, पोलीस नाईक निलेश वाणी, पोलीस हवालदार केशव नागरगोजे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार एन. एल. म्हात्रे करीत आहेत.