Tuesday , February 7 2023

मावळमध्ये शेकापची ताठर भूमिका राष्ट्रवादीला ठरतेय डोकेदुखी

कर्जत : बातमीदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे, मात्र पार्थ यांना शेतकरी कामगार पक्ष सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.

पार्थ पवार यांनी प्रामुख्याने उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघात जाऊन शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी या भेटी घडवून आणत आहेत. रायगड जिल्ह्यातील जे तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात, त्यातील केवळ कर्जत येथे राष्ट्रवादीचा आमदार आहे, मात्र कर्जतमध्ये आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेकाप आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचे वैर आहे. राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत उरण आणि पनवेलमध्ये जशी शेकापची गरज आहे, तशी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मदत मिळाल्याशिवाय लढत देणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन तिन्ही पक्ष एक झाल्याचे दिसून येते, पण कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांतील शेतकरी कामगार पक्षाचे आणि कर्जतमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या जवळ येताना दिसत नाहीत. ही बाब पार्थ यांच्यासमोर दिसून आली असती तर एकवेळ चालले असते, मात्र राष्ट्रवादीमधील हेविवेट नेते समजले जाणारे अजित पवार यांना कर्जत आणि खालापूरमध्ये पार्थला दगाफटका होऊ शकतो हे बैठकीत दिसून आले.

पार्थ यांच्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आपली ताकद उभी करण्याचा प्रयत्नदेखील केविलवाणा असून, ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे उरण, पनवेल, कर्जत विधानसभा मतदारसंघात कधी वावरणे नाही. त्यामुळे त्यांच्या भरवशावर ताकद लावणे हा राजकीय जुगार असून, शेतकरी कामगार पक्ष मागणी करतो म्हणून पार्थ यांना उमेदवारी दिली गेली आहे, मात्र त्याच शेकापचे कार्यकर्ते आम्हाला आमच्या पक्षाचा आदेश आला नाही, असे सांगून थेट अजित पवार यांच्या सभेकडे फिरकत नाही, ही बाब नजरेआड करून चालणार नाही. अजित पवार यांच्या 40 वर्षांच्या राजकीय वाटचालीत त्यांना कधीही मोकळ्या खुर्च्यांसमोर भाषण करावे लागले नसेल.

शेकापचे कार्यकर्ते आपल्या पक्षाकडून आदेश आला नाही, असे सांगत आहेत, मात्र जरी आदेश आला तरी कर्जतमध्ये शेकाप कार्यकर्ते राष्ट्रवादीसाठी मनापासून काम करतील का, हाही प्रश्न आहे. त्यामुळे पार्थ यांची राजकीय वाटचाल मावळमध्ये खडतर असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आता याबाबत राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply