टोकियो ः वृत्तसंस्था
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करीत आहेत. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी नेमबाजीत चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. अवनीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती. अवनीला अंतिम फेरीमध्ये चीनच्या नेमबाजाने कडवी लढत दिली, पण नंतर अवनीने अचूक लक्ष साधत तिचा पराभव केला. चीनची महिला नेमबाज झांगने 248.9 गुणांसह रौप्यपदक मिळवले. राजस्थानमधील जयपूर येथे राहणार्या अवनी लेखराला 11 वर्षांची असताना अपघात झाला होता. या अपघातात तिला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, ज्यामुळे ती अर्धांगवायूग्रस्त आहे. अवनीला तिच्या वडिलांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी या दोन्ही खेळांमध्ये रस दाखवला होता, पण शेवटी तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले आणि आता इतिहास रचला आहे.
पंतप्रधान मोदींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवनी लेखराचे कौतुक केले आहे. ‘विलक्षण कामगिरी अवनी लेखरा! तुझा मेहनती स्वभाव आणि नेमबाजीची आवड यामुळे हे शक्य झाले. सुवर्ण जिंकल्याबद्दल अभिनंदन! भारतीय खेळांसाठी हा खरोखरच एक खास क्षण आहे. तुझ्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा,’ असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलेय.