Breaking News

पनवेलमध्ये ‘रॉकस्टार’ थिरकले!

धमाल डान्स शोला जबरदस्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
रंगमंचावर एकाहून एक सरस नृत्य सादर करणारे कलाकार… त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देणारे पालक… मान्यवरांची उपस्थिती अन् त्यांच्याकडून कौतुकाची थाप… अशा अतिशय उत्साही वातावरणात रॉकस्टार डान्स अकॅडमीचा धमाल 2022 डान्स शो मंगळवारी (दि. 14) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला.
हल्लीच्या युगात शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये एखादा तरी कलागुण असणे आवश्यक आहे. यासाठी पालकही सजग झाले असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर रॉकस्टार डान्स अकॅडमी मुलांना नृत्य क्षेत्रात व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या अकॅडमीचा वार्षिक डान्स शो मंगळवारी रंगला. कोरोनामुळे दोन वर्षे कोणतेच कार्यक्रम होऊ शकले नव्हते. सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद नव्हते. त्यामुळे यंदाच्या पनवेलमधील डान्स शोची प्रचंड उत्सुकता होती. या वेळी कलाकारांनी दिलखेच अदाकारी पेश करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरील नृत्य सादर करून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला. यामध्ये राकेश बने यांनी शिवरायांची अप्रतिम भूमिका साकारली. त्यांना सहकलाकारांनी उत्तम साथ दिली. यानंतर विविध गीतांवर मुला-मुलींनी नृत्याचे सादरीकरण केले. यामध्ये स्त्री-भ्रूणहत्या रोखून मुली वाचवा हा संदेशही एका नृत्याद्वारे देण्यात आला. विशेष म्हणजे या शोमध्ये उपस्थित कलाकारांच्या मातांनाही मंचावर डान्स करण्याची संधी अकॅडमीकडून देण्यात आली. या वेळी त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. या शोमध्ये चार वर्षांपासून ते युवावर्गापर्यंतच्या कलाकारांनी सहभाग घेऊन आपल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाला चार चाँद लावले.
या शोला प्रमुख पाहुणे म्हणून टाईमपास चित्रपट फेम जयेश चव्हाण, मराठी इंडियन आयडल विजेता सागर म्हात्रे, संस्कृती टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स आणि एसमार्टचे संस्थापक रोहन पाटील उपस्थित होते. शोचे सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले. रॉकस्टार डान्स अकॅडमीला 14 वर्षे पूर्ण झाली असून मुंबई, पेण, पनवेल, डेरवली अशा विविध शाखा आहेत. या यशस्वी वाटचालीबद्दल प्रमुख पाहुण्यांनी अकॅडमीचे प्रमुख रोशन कांबळे यांचे कौतुक केले.
रॉकस्टार डान्स अकॅडमीतर्फे दरवर्षी एक परीक्षा घेतली जाते. यामध्ये जे विद्यार्थी उत्तम कामगिरी बजावतात त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस दिले जाते. यंदा तीन गटांमध्ये विजेते निवडण्यात आले. यातील मोठ्या गटात लौकिक पाटील प्रथम व नूपुर भोईर द्वितीय, मध्यम गटात आयुष पाटील व शौर्य पाटणे संयुक्तपणे प्रथम व प्रियांश ठाकूर द्वितीय, तर छोट्या गटात वेदा म्हात्रे प्रथम व औक्ष पाटणे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या सर्वांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या डान्स शोनंतर एक वेगळीच ऊर्जा व अनुभूती घेऊन सर्व जण घरी परतले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply