एपीएमसीत ग्राहकांची पाठ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ बाजारात फळांच्या राजा हापूस आंबा दाखल झाला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने या वर्षी हापूस आंब्याची बाजारातील आवक नेहमीच्या मानाने घटलेली आहे. त्यातच कोरोनाच्या प्रभावाने बाजारात आंब्याला आता उठावही नाही, निर्यातही कमी ठप्प असल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदार आणि व्यापार्यांची चिंता वाढली आहे.
हापूसच्या एकूण उत्पादनाच्या 40 टक्के आंबा आखाती देशात निर्यात होतो तर 60 टक्के हापूस स्थानिक बाजारात विक्री होतो. मुंबई बाजार समितीमध्ये साधारणपणे 70 ते 80 निर्यातदार आहेत. हे व्यापारी एअर कार्गोमधून परदेशात भाजीपाला, फळे पाठवतात. यांच्या माध्यमातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडचे हापूस बागायतदार आंब्याच्या निर्यातीसाठी सज्ज असतानाच सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. आता तर संपूर्ण आशिया खंडात कोरोनाने हाहाकार घातला असल्याने त्याचा हापूस आंब्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.