Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या प्रकल्पांचा शुभारंभ; लोकप्रतिनिधींची उपस्थिती

मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहेत. याचबरोबर देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपैकी महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये मुंबई महानगर प्रदेश परिसरात विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प साकारत अन्य महामंडळांसोबतच सिडकोने मोठे योगदान दिले आहे. याचाच परिपाक म्हणजे महाराष्ट्र हे देशाच्या इकॉनॉमीचे ग्रोथ सेंटर सिद्ध झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.15) केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोडमार्ग, लोकनेते दि.बा. पाटील भूमिपुत्र भवन, उलवे किनारी मार्ग आणि प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरूळ या सिडकोच्या सुमारे पाच हजार कोटी किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, डॉ. कैलास शिंदे, दिलीप ढोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकासकामे होत असून उभी राहणारी विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) ही राज्याकरिता अश्वशक्ती असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविकात सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी उद्घाटन व भूमिपूजन होत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करून संक्षिप्त माहिती दिली.
या वेळी सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोडमार्ग आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे लोकनेते दि.बा. पाटील भूमिपुत्र भवन आणि प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरूळ या नागरी हिताच्या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकनेते दि.बा. पाटील भूमिपुत्र भवनाचे उद्घाटन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने अटल सेतूसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या उद्दिष्टाला हातभार लावून सिडकोनेही परिवहनाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. खारघर-तुर्भे जोडमार्ग हा 5.4 किमी लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कदरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. उलवे किनारी मार्ग हा अटल सेतू (एमटीएचएल) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा सहा पदरी मार्ग विकसित करण्यात येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास थेट जोडणार्‍या या पुलामुळे पुणे व अन्य शहरांमधून येणार्‍या वाहनांना थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे.
उलवे येथील लोकनेते दि.बा. पाटील भूमिपुत्र भवन हे नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे. याचबरोबर या भवनाच्या माध्यमातून स्थानिकांना त्यांचे विविध सोहळे व कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काची जागा प्राप्त होणार आहे. नेरूळ येथे प्रवासी जलवाहतूक टर्मिनस विकसित करण्यात आले असून येथून नवी मुंबई ते दक्षिण मुंबई आणि कोकण यादरम्यान रो-रो आणि स्पीड बोटसेवा लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय नेरूळ, नवी मुंबई येथून मुंबई (भाऊचा धक्का) तसेच एलिफंटा गुंफा, मांडवा, रेवस इत्यादी ठिकाणी जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे या प्रदेशांदरम्यान प्रवासाचे अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे तसेच पर्यटकांनाही या ठिकाणाला भेट देऊन रम्य सागरी प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.

Check Also

नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक -मंत्री उदय सामंत

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन विनियमावली …

Leave a Reply