पनवेल तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या 20
पनवेल : प्रतिनिधी
उलवे नोडमध्ये तीन आणि खारघरमध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 20 झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.
उलवे नोड सेक्टर 20मधील कोरोना झालेल्या व्यक्तीच्या घरातील तीन व्यक्तींची टेस्ट सोमवारी (6 एप्रिल) पॉझिटिव्ह आल्याने एकाच घरातील चार जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे खारघरमध्येही एक नवा रुग्ण आढळला आहे.
कळंबोलीत 11, कामोठ्यात 2, खारघरमध्ये 3 असे महापालिका हद्दीत 16 आणि उलवे नोडमध्ये चार अशी कोरोना रुग्णांची पनवेल तालुक्यातील संख्या 20 झाली आहे. यापैकी एक सीआयएसएफ जवान आणि अन्य दोन रुग्ण बरे झाले असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.
नवी मुंबईतील दुसर्या रुग्णाचा मृत्यू
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोनाची लागण झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी (दि. 5) मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. नेरूळ परिसरातील एका वृद्धाला कोरोनाची बाधा झाली होती. रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे नेरूळमध्ये दोन व घणसोलीत एक असे तीन नवे रुग्ण आढळून आले. यापैकी नेरूळ सेक्टर 10मध्ये राहणारा तरुण सध्या गावी गेलेला असल्याने त्याला सातारा जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय सर्व नवीन रुग्णांच्या नातेवाईकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.