Breaking News

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी तालुका प्रशासन सज्ज

रोहे : प्रतिनिधी

देशभर कोरोनाचा फैलाव सुरू असून शासन स्तरावर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कोरोनाविरुध्द लढत असताना दुसरीकडे सर्वच प्रशासन यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी सुयोग्य नियोजन करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग प्रथम शहरापुरता होता, पण आता कोरोनाचा धोका हळूहळू शहरातून गावाकडे वाटचाल करू लागला आहे. अशा वेळी ग्रामविकास खात्याचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंचायत समितीची भूमिका महत्त्वाची आहे. रोहा तालुक्यातील अनेक नागरिक रोजगारासाठी मुंबईत वास्तव्यास आहेत, परंतु कोरोनाचा वाढता धोका लक्षात येताच अनेकांनी गावाची वाट धरली आहे. जिल्ह्याबाहेरून येणार्‍या नागरिकांपासून कोरोनाचा धोका अधिक आहे हे लक्षात घेऊन रोहा गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी तालुक्यातील सर्व यंत्रणा कामास लावल्याचे दिसून येत आहे. रोहा तालुक्यात 64 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी  जनजागृती, जंतुनाशक फवारणी, सॅनिटायझर वाटप तसेच स्वच्छतेसह विविध उपाययोजना  करण्यात येत आहेत. रोहा तालुक्यात 15 मार्चपासून 8541 व्यक्ती विविध गावांमध्ये आल्या आहेत. यामध्ये 30 परदेश प्रवास केलेल्या, 113 परजिल्ह्यातून आलेल्या, तर 8398 राज्याच्या अन्य भागातून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यात लक्षणे आढळल्यास तपासणी करण्यात येत आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply