Breaking News

कोरोनाविरोधातील लढाईला रायगडात प्रतिसाद; पोलादपुरात सलूनचे शटर डाऊन

पोलादपूर : प्रतिनिधी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलादपूर शहरातील सलून व्यावसायिकांनी शुक्रवारी व शनिवारी सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सलून चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पवार यांनी दिली. या वेळी शहरातील सलून व्यावसायिकांना संघटनेतर्फे कोरोना प्रतिबंधक मास्कचे वाटपही करण्यात आले.

पोलादपूर तालुका नाभिक समाज संघटना आणि पोलादपूर सलून चालक मालक संघटनेचे पदाधिकारी तालुका सचिव आदेश दशरथ बुरुणकर, शहर सचिव सुरेश विठोबा पवार यांनी अध्यक्ष विजय पवार यांना निवेदन देऊन सलून बंदीचा निर्णय जाहीर केला.

– श्रीवर्धनमधील लॉजिंग, हॉटेल्स, रिसॉर्ट बंद

श्रीवर्धन : प्रतिनिधी

 कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर श्रीवर्धनमधील हॉटेल्स, लॉजिंग व रिसॉर्ट मालकांनी 31 मार्चपर्यंत आपली हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर दिवेआगरच्या सर्व हॉटेल व रिसॉर्ट मालकांनी एकत्र येऊन पर्यटक ठेवायचे नाहीत, असा निर्णय घेऊन आपली हॉटेल बंद केली होती.

श्रीवर्धनचे प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी व पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी तालुक्यातील सर्व हॉटेल मालकांची बैठक येथील तहसील कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीमध्ये प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून हॉटेल्स बंद ठेवण्याबाबत सुचवण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत, सर्व व्यावसायिकांनी आपली हॉटेल्स व रिसॉर्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच श्रीवर्धन पोलिसांकडून परदेशी नागरिक कोठे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

-रायगडात 289 जण देखरेखीखाली

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात 1 मार्चपासून 327 लोक विदेशातून आले आहेत. तर 13 मार्चपासून विदेशातून आलेल्यांची संख्या 180 इतकी आहे. त्यातील 19 जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत 197 जण त्यांच्याच घरात देखरेखीखाली आहेत. तर 92 जणांना विलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्हयात आतापर्यंत केवळ एकच करोना बाधित रूग्ण आढळला असून त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत.

-‘कामोठ्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रकृती स्थिर’

पनवेल : वार्ताहर

कामोठ्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

या संदर्भात माहिती देताना आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले की, कामोठ्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण हा मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. सदर रुग्णाची आजच्या घडीला प्रकृती उत्तम असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. तरी नागरिकांना प्रशासनास सहकार्य करावे व आवश्यक त्या काळजी घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply