Breaking News

लासलगाव बाजार समितीत 10 दिवस लिलाव बंद

नाशिक ः प्रतिनिधी : पूर्वी हस्तलिखित चोपडीवर होणार्‍या जमाखर्चाचे हिशेब व देवघेवेची मिळवणी करण्याकरिता बंद राहणारे मार्चअखेर 10-12 दिवस बंद राहिलेले शेतमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असताना यावर्षीही सलग 10 दिवस शेतमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांसह शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे.

शेतकरी हित नजरेसमोर ठेवून व कांदा पिकांची होणारी आवक व कमी झालेले भाव यामुळे हैराण झालेल्या शेतकरीवर्गाची आर्थिक कोंडी होऊ नये व मार्चअखेर बँकांची देणी देण्याकरिता बंद कालावधी कमी करावा, अशी मागणी शेतकरीवर्गाच्या वतीने करण्यात आली आहे. लासलगाव बाजार समिती आवारावरील कांद्यासह शेतमालाचे भुसार लिलाव शनिवार दि. 23 मार्च ते सोमवार दि. 1 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने आता तब्बल 10 दिवस शेतकर्‍यांना आपला शेतमाल विक्री करता येणार नसल्याने शेतकर्‍यांची मोठी गैरसोय होणार आहे. शनिवारी चौथा शनिवार असल्याने व 24 रोजी रविवारची सुटी असल्याने लिलाव प्रक्रिया बंद होती, तर सोमवार दि. 25 रोजी रंगपंचमीनिमित्त शेतमाल लिलाव बंद राहतील. मंगळवार दि. 26 ते सोमवार दि. 1 एप्रिलपर्यंत मार्च एण्डचे कारण देत व्यापारीवर्गाने बाजार समितीला पत्र देत लिलावात सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे शनिवार दि.23 मार्च ते सोमवार दि. 1 एप्रिलपर्यंत असे तब्बल 10 दिवस लासलगाव बाजार समितीमधील लिलाव बंद राहणार असल्याचे लासलगाव बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे, तर या बाजार समितीतील कांद्यासह भुसार शेतमाल लिलाव तब्बल 10 दिवस बंद राहणार असल्याने शेतकर्‍यांना आपला शेतमाल विक्री करता येणार नसल्याने त्यांची मोठी आर्थिक अडचण होण्याची शक्यता आहे.

शिवारात लाल कांदा संपत आला असून हा कांदा टिकावू नसल्याने तो जास्त काळ साठवून ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे बाजार समितीतील लिलाव बंद प्रक्रियेमुळे शेतकर्‍यांची

आर्थिक कोंडी होणार असून मंगळवारी 2 एप्रिलला बाजार समिती आवारातील शेतमाल लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply