नोकरासह दुकानदारावर गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात रेशनवरील धान्याचा काळाबाजार करण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. असा गोरखधंदा करणार्या अलिबाग तालुक्यातील दिघोडी येथील रास्तभाव दुकान परवानाधारक महेंद्र ठाकूर व त्याचा नोकर महेश ठाकूर यांच्याविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पोलिसांनी दिघोडी येथील दुकानात बनावट ग्राहक पाठवून हा काळाबाजार उघडकीस आणला आहे . शासनाने तीन रुपये किलो दराने विक्रीसाठी दिलेला तांदूळ चक्क प्रतिकिलो 20 रुपये अधिक घेऊन विकताना या दुकानातील नोकराला रंगेहाथ पकडण्यात आले. बनावट ग्राहक असलेल्या या व्यक्तिकडे पोलिसांनी पैसे दिले. त्या पैशात रेशन कार्ड नसतानाही या व्यक्तीने दुकानातातून जादा पैसे मोजून 50 किलो तांदूळ विकत घेतला. त्याचवेळी पोलीस आाणि पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकला.
सध्या लॉकडाऊन असल्याने नागरिकांना पुरेसे धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रांरीवरून आता पोलीस आणि पुरवठा विभागाने छापासत्र सुरू केले आहे. दिघोडी येथील या कारवाईनंतर रेशनिंगवरील धान्याचा काळाबाजार करणार्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.