Breaking News

कोरोना बदलापूरपर्यंत आल्याने रायगड हद्द बंद करण्याची मागणी

कर्जत ः बातमीदार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करून रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या जिल्हा हद्दीवर चौकी बसवण्यात आली आहे, मात्र असे असतानाही मोठ्या प्रमाणात वाहने कर्जत तालुक्यात येत असून, कोरोना शेजारच्या बदलापूरमध्ये पोहचला आहे. त्यामुळे जिल्हा हद्द बंद करण्याची वेळ आली असून कोरोनापासून कर्जत तालुक्याला वाचविण्यासाठी प्रशासनाने जिल्हा हद्द बंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातून वाहने येणे सुरूच असून तालुक्यातील सर्व बँकांत येणारे कर्मचारीदेखील ठाणे आणि मुंबईतून येत असल्याने कोरोनाला रोखणार कसे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. कर्जत तालुक्यात शेलू आणि कळंब येथे जिल्हा हद्दी आहेत. त्या दोन्ही हद्दी रायगड पोलिसांनी सील केल्या असून आवश्यकता असलेल्या वाहनांनाच फक्त जिल्हा हद्द ओलांडू दिली जाते. शेजारच्या मुरबाड येथे कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता कर्जत तालुक्यापासून सर्वांत जवळची नागरी वसाहत असलेल्या बदलापूरमध्येही कोरोनाचे एकाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. मुरबाड हे कर्जत तालुका व जिल्हा हद्दीपासून बर्‍याच अंतरावर असून त्या भागात 90 टक्के जंगल आहे, तर बदलापूर हे कर्जत तालुका आणि जिल्हा हद्दीपासून जेमतेम 12-13 किलोमीटरवर आहे. त्यामुळे कोरोना कर्जतच्या वेशीवर आल्याने नेरळमध्ये कल्याणच्या बाजारातून भाजीपाला आणि फळे येतात. त्याच्या माध्यमातून कोरोना कर्जतमध्ये येऊ शकतो. त्यामुळे जिल्हा हद्द बंद करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. जिल्हा हद्दीत येणारी व्यक्ती निर्जंतुक होऊन पुढे जावी यासाठी तेथे निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याची मागणी शेलू गावातील पोलीस पाटील मनोज पाटील यांनी केली आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply