नवी मुंबई : प्रतिनिधी
स्कोडा कारवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून कारमधून दारुची विक्री करणार्या तरुणाला परिमंडळ-1 मधील अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले आहे. वरुण कमलेश खेमाणी (28) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या स्कोडा कारमधून विदेशी मद्याच्या हजारो रुपये किमतीच्या बाटल्या तसेच त्याची स्कोडा कार जफ्त केली आहे. या वेळी वरुणसोबत त्याची आईसुद्धा असल्याने पोलिसांनी या प्रकरणात वरुणची आई छाया कमलेश खेमाणी (54) यांना देखील सहआरोपी केले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्यामुळे देशातील सर्व प्रकारचे व्यवहार, कामधंदे बंद ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय मद्याच्या खरेदी-विक्रीवरही पोलिसांनी बंदी घातली आहे. असे असतानाही नेरुळच्या भिमाशंकर सोसायटीत रहाणारा वरुण खेमाणी हा गुरुवारी रात्री नेरुळ सेक्टर-11 भागात स्कोडा कारमधून दारुविक्री करण्यासाठी गेला होता. या वेळी त्याची आईसुद्धा त्याच्यासोबत होती. याबाबतची माहिती परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या अधिपत्याखालील अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास नेरुळ सेक्टर-11 मध्ये धाव घेतली.
या वेळी हिल व्ह्यू अपार्टमेंटच्या समोरील रोडवर उभ्या असलेल्या स्कोडा कारमध्ये बसलेल्या दोघांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे तसेच स्कोडा कारजवळ आलेला एक व्यक्ती मद्याची बॉटल घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विशेष पथकातील पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, मद्याची बाटली घेण्यासाठी आलेल्या व्यक्ती पळून गेला. या वेळी पोलिसांना कारमध्ये बसलेल्या वरुण खेमाणी याच्या हातात दारुची बाटली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी वरुणकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला विदेशी दारुच्या बाटल्या विकण्यासाठी आल्याचे कबूल केले आहे.
विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त
वरुण आणि त्याची आई ज्या स्कोडा कारमधून दारु विक्रीसाठी आले होते, त्या कारवर अत्यावश्यक सेवा, नवी मुंबई महानगरपालिका अॅशकम एंटरप्रायजेस कमलेश खेमाणी असा स्टीकर असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी स्कोडा कारसह त्यात असलेल्या हजारो रुपये किंमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी वरुणला ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणात वरुणच्या आईलादेखील सहआरोपी केले आहे.