औरंगाबाद : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळावरून निघालेल्या स्थलांतरित मजुरांना मालगाडीने चिरडल्याने 16 जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबादजवळील बदनापूर-करमाडदरम्यान शुक्रवारी
(दि. 8) सकाळी 6 वाजता हा भयंकर अपघात झाला.
सर्व 19 मजूर हे जालन्यातील एसआरजे कंपनीत काम करणारे होते. लॉकडाऊन सातत्याने वाढत असल्याने त्यांनी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशला जाण्यासाठी भुसावळला रेल्वेगाडी मिळेल अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार ते पायी भुसावळला चालले होते. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते रेल्वे रुळांवरून जात होते. रात्र झाल्याने सटाणा शिवाराजवळ रेल्वे रुळावरच पथारी पसरून ते झोपी गेले. तिथेच घात झाला.
पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आपण या दुर्घटनेबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून, त्यांना तेथील स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करीत सांगितले आहे. पीडितांना तसेच सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
प्रत्येकी पाच लाखांची मदत
औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. या अपघातातील जखमींवरील उपचाराची सर्व व्यवस्था केली जाईल, उच्च अधिकार्यांचे पथक औरंगाबादला पाठवण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …