नवी मुंबई : बातमीदार
नेरूळ सेक्टर 8 येथे राहणार्या व मुंबईतील रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या भावालाही कोरोना संसर्ग झाला आहे, तर आई, वडील व बहाणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
नेरूळ येथील डॉक्टरला मुंबईतील रुग्णालयात कार्यरत असताना कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने या विषाणूची बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे, मात्र अहवाल येण्यापूर्वी हा डॉक्टर नेरूळ सेक्टर 8 येथील घरी येऊन कुटुंबीयांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याला मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवी महापालिकेने तातडीने डॉक्टरच्या कुटुंबातील चार सदस्यांची चाचणी केली. यात त्या डॉक्टरच्या भावास कोरोनाची लागण झाली असून आई, वडील व बहिणीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. डॉक्टरच्या भावास नवी मुंबईत आयसोलेशन करण्यात आले आहे, तर इतर तिघांनादेखील खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हे कुटुंबीय राहत असलेले घर सील करून इमारतीच्या परिसरात पालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात आल. त्याचप्रमाणे सभोवतालचा परिसर कन्टेन्मेट झोन जाहीर करण्यात आला आहे. या रुग्णांमुळे नवी मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांंची संख्या 36वर गेली आहे.