म्हसळा : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असताना ठेवण्यात आला असतानाही बेकायदेशीरपणे मद्यविक्री श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील हॉटेल साईश्री परमीट रूम व बारवर दिघी सागरी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तेथून पाच लाखांहून अधिक रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
बोर्ली पंचतन येथे कायद्याचे उल्लंघन करून मद्यविक्री केली जात असल्याची खबर दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेंद्र शेलार यांना खबर्याकडून मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी साईश्री परमीट रूम व बारमध्ये डमी गिर्हाईक पाठविला असता, त्याला दारू विकत देत असताना ओंकार महादेव रेळेकर याला रंगेहाथ जेरबंद करण्यात आले. या वेळी रेळेकर यांच्याजवळील 5 लाख 23 हजार 266 रुपये किमतीच्या बिअर व विदेशी दारुच्या सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात मुंबई प्रोव्हाशिन अॅक्ट कलम 65 खंड (ई), 82 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जागडे करीत आहेत.