Breaking News

कळंबोलीत मॉर्निंग वॉक करणार्‍यांवर पुन्हा कारवाई; कोरोनाविरोधात लढण्याची 56 जणांना पोलिसांकडून शपथ

कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार

कळंबोलीत मॉर्निंग वॉक करणार्‍या 35 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 12) पुन्हा 56 जणांना मॉर्निंग वॉक करीत असताना पोलिसांनी पकडून भा. दं. वी. कलम 188 अन्वये कारवाई केली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांना कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करून कोरोनाचा सामना करण्याची शपथ देण्यात आली. त्यानंतर योग्य ती समज देऊन तूर्त घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाने सर्वत्र दशहत निर्माण केली असल्याने देशात व राज्यात लॉकडाऊन तसेच संचारबंदी असून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तरीही कळंबोलीतील काही अतिउत्साही व बेफिकीर लोक शासकीय नियमांचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करीत आहेत. अशा 35 नागरिकांवर कारवाई झाली होती. रविवारी पुन्हा 56 नागरिक मॉर्निंग वॉक करीत असताना आढळले. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

-चार पथकांची स्थापना

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 18चा भंग करणार्‍या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सतिश गायकवाड यांनी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांची नेमणूक केली आहे. ही पथके विनाकारण फिरणार्‍यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आवाहन आणि इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply