मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद
सातारा ः प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर दुसर्या दिवशी सातार्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. येथे गृहराज्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गोवर्या पेटवत तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करीत तोडफोड करण्यात आली आहे.
सातार्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका परिसरातील निवासस्थानासमोर गुरुवारी (दि. 6) अज्ञात व्यक्तीने गोवर्या पेटवत मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करीत असल्याची घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे दुसर्या एका घटनेमध्ये काही अज्ञातांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करीत तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हल्ले करणार्या अज्ञातांचा शोध सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलीस करीत आहेत. दुपारपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मराठा आरक्षण रद्द केल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अज्ञातांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनांमुळे सातार्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सध्याचा राज्यातील लॉकडाऊन उठल्यावर मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशारा सातार्यातील मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला बुधवारी आरक्षण रद्द करण्याचा निकाल आला त्या दिवशीच दिला होता. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ सातार्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली होती.