मुरूड ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाहतूक सुरू असेल तर आर्थिक स्त्रोत प्राप्त करणार्या एसटीला मात्र बंदकाळात कर्मचारी वृंदाचे पगार करणे खूप कठीण जात होते. प्रत्येक महिन्याच्या 1 व 7 तारखेला कर्मचार्यांचे पगार होत असत, परंतु वाहतूक बंद झाल्याने पगार रखडले होते. महामंडळाकडे असणार्या शिल्लक रकमेतून पगार होणे अशक्य होते. त्यामुळे वेळेत पगार होऊ शकले नाहीत. अखेर शासनाकडील विविध सवलतीच्या दरात असणारे सुमारे 150 कोटी रुपये महामंडळास प्रदान केल्याने एसटीला कर्मचारी वृंदाचे पगार करणे शक्य झाले आहे.
राज्य शासनाच्या विविध 35 योजना एसटी महामंडळ चालवत असून त्या सवलतीच्या पैसे शासनाकडून येणे बाकी होते. अशा कठीण परिस्थितीत शासनाने सवलतीचे पैसे वळते केल्याने आता राज्यातील सर्व एसटी कर्मचारी वृंदाचे पगार त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, यापुढेही नियमित तारखेस पगार जमा व्हावेत, अशी अपेक्षा एसटी कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाची 31 विभागीय कार्यालये, तर संपूर्ण महाराष्ट्रात 246 आगार असून यामध्ये लाखो कर्मचारी कार्यरत आहेत.