पनवेल : बातमीदार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता यावर पर्याय काढण्यासाठी पालिका प्रशासन अनेक युक्त्या आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन रात्रीचा दिवस करून काम करत आहे. या वेळी भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी कडक उपाययोजना म्हणून शेतकर्यांचा माल थेट आपल्या दारात ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पालिकेच्यावतीने छणङचउङउ मोबाइल अॅपवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण जगात हाहाकार माजविणार्या कोरोना विषाणूपासून अनेक देश संकटात आले आहेत. या वेळी इतर देशाच्या तुलनेत भारतातील व्यवस्था उत्तम काम करताना दिसून येत आहे. मात्र काही तुरळक नागरिकांची बेफिकीरी व कोरोना बाबत माहिती असूनही परदेश प्रवास लपवून ठेवणे, इतरांच्या संपर्कात येणे. लॉकडाऊनचे पालन न करणे. घराबाहेर काही ना काही कारण देऊन फिरणे. गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंग पाळावे असे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करणे. यामुळे कोरोनाचे संकट तीव्र होण्याची चिन्हे उद्भवली आहेत. अनेक लोक रोज रोज ताजा भाजीपाला पाहिजे म्हणून बाजारात गर्दी करत असल्याने अपरिहार्यपणे शेवटी एपीएमसी मार्केट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गरजूंना आवश्यक असलेला भाजीपाला, फळे हे काही तुरळक लोकांच्या चुकीमुळे आता मिळणे दुरापास्त होऊ लागले असल्याकारणाने पालिकेच्या वतीने शेतमाल थेट दारापर्यंत पोहोचविण्याची योजना राबविण्यात आली. नुकतीच रोडपाली येथील सोसायट्यांना प्रायोगिक तत्वावर हा शेतमाल शेतकर्यांनी स्वतः आणून माफक दरात विकला आहे. स्वच्छता, सॅनिटायझर्सचा व मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन करून नागरिक देखील या खरेदीचा आनंद घेत आहेत. प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड, अभियंता राहूल जाधव व सहायक आयुक्त चंद्रशेखर खामकर यांनी या विक्रीसाठी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले. पालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांमधून तसेच प्रशासनाच्या इतर आस्थापनांमधून कौतुक होत आहे. या वेळी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभागात थेट शेतमाल विक्री योजना कार्यान्वित करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे तसेच छणङचउङउ मोबाइल अॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.