कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत आदिवासीबहुल ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतमधील आदिवासी लोकांच्या घरची चूल गेली 21 दिवस सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पेटू शकली नाही. ही बाब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर्जत शहरातील व्यापार्यांच्या कानावर घालण्यात आली. त्या अनुषंगाने कर्जत शहरातील सहा व्यापार्यांनी एकत्र येत मोग्रज ग्रामपंचायतमधील 300 गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप केले.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली बेरोजगारी आणि त्यामुळे होणार्या उपासमारीबद्दल ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये आपली कैफियत मांडत होते. ग्रामपंचायतमधील गावांची संख्या व लोकवस्ती लक्षात घेता तुटपुंजी आर्थिक उलाढाल असलेल्या मोग्रज ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा देशमुख आणि उपसरपंच विलास भला यांनी कर्जतमधील काही दानशूर व्यापार्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. ही बाब लक्षात घेऊन कर्जत शहर बाजारपेठेतील काही व्यापार्यांनी मोग्रज ग्रामपंचायतमधील आदिवासीवाड्यांत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तेथील परिस्थिती बघून 50 आदिवासी लोकांना मदत करण्याची तयारी करणार्या व्यापार्यांचे मन हेलावले आणि त्यांनी 300 कुटुंबांना मदत करण्याचे ठरवले.
कर्जतमधील व्यापार्यांनी रक्कम गोळा करून जीवनावश्यक वस्तूंचे 300 किट बनवून मोग्रज येथे नेले. रोनक ओसवाल, हितेश सोळंकी, मनोज ओसवाल, राजेंद्र मेडिकल, दिनेश ओसवाल, राकेश ओसवाल यांनी आपल्या मित्र परिवारासह मोग्रज ग्रामपंचायतमधील मेचकरवाडी अ, मेचकरवाडी ब, चौधरवाडी, जाधववाडी, मालेगाव, मालेगाव कातकरीवाडी या ठिकाणी जाऊन स्वतः धान्याच्या किटचे वाटप केले. सरपंच रेखा देशमुख, गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, नायब तहसीलदार संजय भालेराव, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. या वेळी उपसरपंच विलास भला, पुंडलिक देशमुख, गणेश लडके, अशोक मेचकर, शंकर चौधरी, महेंद्र भोईर, रमेश मराडे, गणेश म्हसे यांच्यासह महसूल मंडळ अधिकारी गोरेगावकर, तलाठी संजय ठाकरे, गुरू मूर्ती, ग्रामविकास अधिकारी म्हात्रे आदी उपस्थित होते.