महाड : प्रतिनिधी – महाड एसटी आगारातील मॅकेनिक गजानन मोरे यांनी महाड शहरातील रस्त्यांवर सुंदर कलाकृती काढुन कोराना संकटाविरोधात लढण्यासाठी आपल्या रोड पेंटिंगच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. महाड शहरांच्या मुख्य पाच चौकात त्यांनी ही चित्रे साकारली आहेत.
महाड एसटी आगारात मॅकेनिक या पदावर काम करणारे नवेनगर येथील गजानन मोरे यांनी आपल्या मित्रासोबत स्वखर्चाने कोरोना या वैश्विक महामारी विरोधात लढताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करणारी चित्रे महाड शहरातील मुख्य चौकात रेखाटली आहेत. दिवसेंदिवस भारतात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असुन, प्रशासनाकडून दिल्या जाणार्या सुचनांचे आणि निर्बंधाचे पालन होताना दिसत नाही. या घटनेने व्याकुळ होऊन गजानन मोरे यांनी चित्राद्वारे जनजागृती करावी असे ठरवुन, त्यांनी महाड शहरातील मुख्य चौकांमधुन सुंदर चित्रे काढली आहेत. ही रोड पेंटिंग लोकांच्या कुतुहलाचा विषय ठरली आहेत. या लॉकडाऊनच्या काळातही लाखोरुपयांचा खर्च करून मोरे यांनी ही चित्रे साकारली आहेत.