Breaking News

माणगावात मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांवर कारवाई

माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करून जनतेला विविध सूचना सातत्याने करीत आहेत. तरीही अजूनही अनेक जण याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. नागरिकांनी जास्तीत जास्त घरातच थांबून या विषाणूला पळवून लावावे, असे सरकार व प्रशासन नागरिकांना वेळोवेळी बजावत असतानाही काही नागरिक त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या आदेशाची पायमल्ली करून मॉर्निंग वॉकला जाणार्‍या काही नागरिकांवर माणगाव पोलिसांनी शनिवारी (दि. 18) पहाटे सीआरपीसी 68,69प्रमाणे कारवाई करून नंतर समज देऊन सोडण्यात आले.
पनवेल व उरण तालुक्यांनंतर आता दक्षिण रायगडमधील श्रीवर्धनमध्येही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने माणगावसह आसपासच्या सर्वच तालुक्यांतील धास्ती वाढली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. विनाकारण बाजारपेठेत व शहरात कोणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यानुसार माणगावात शनिवारी पहाटे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करून सोडून देण्यात आले. माणगावकर नागरिकांनी कोरोना महामारीतून आपली लवकरात लवकर सुटका होण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांनी केले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply