Breaking News

शिवऋण प्रतिष्ठान आणि पालीतील नागरिकांनी केली मनोरुग्णाची शुश्रूषा

पाली : प्रतिनिधी

मागील अनेक दिवसांपासून एक मनोरुग्ण पालीत बकाल व जर्जर अवस्थेत फिरत होता. या मनोरुग्णाला शिवऋण प्रतिष्ठान व पालीतील सुज्ञ नागरिकांनी नुकतेच स्वच्छ केले, दाढी व केस कापून कपडे व जेवू घातले आणि त्याची शुश्रूषा केली. हा मनोरुग्ण फाटके व खराब कपडे, केस दाढी वाढलेली, बकाल व अस्वच्छ अवस्थेत भटकत होता. खुप लोकांना त्याची घृणा वाटत होती. मात्र शिवऋण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केतन म्हसके व त्यांच्या सहकार्‍यांनी या मनोरुग्णाची सुश्रुषा केली. केतन म्हसके यांच्यासह गंगाधर पांडव यांनी या मनोरुग्णाचे केस, दाढी व नखे कापली. अक्षय दपके यांनी लागलीच नेलकटर आणले. हर्षल काटकर यांनी मोफत जेवण दिले. रोहन राऊत यांनी माचीस, मेणबत्ती व इतर साहित्य आणले. यावेळी रोशन रुईकर, कपिल पाटील व अनिकेत पडवळ आदी नागरिक उपस्थित होते. या मनोरुग्णाला समाधान भगत यांनी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेले. या संपूर्ण कामासाठी तहसीलदार दिलीप रायण्णावार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांचेही सहकार्य लाभले. काही महिन्यांपूर्वी शिवऋण प्रतिष्ठानने बकाल व जर्जर अवस्थेत खितपत पडलेल्या आणखी एका मनोरुग्णाची शुश्रूषा करून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply