Breaking News

कामोठ्यामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी, ईदच्या धार्मिक रॅलीमधून मुस्लिम बांधवांनी दिला शांतता आणि एकतेचा संदेश

पनवेल : प्रतिनिधी

कामोठे येथे सुन्नी गौसीया चिश्तीया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ईद मिलादुन्नबी (मोहम्मद पैगंम्बर) जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ट्रस्टच्या वतीने जयंतीनिमित्त नूर-ए-मोहम्मदी मदरसा (शाळा) या विद्यार्थ्यांना स्कूल युनिफॉर्मचे मोफत वाटप करून मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत राष्ट्रध्वज फडकल्याने कामोठा परिसरात या रॅलीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. संपूर्ण कामोठा शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीला पाच हजार मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दाखविली. रॅलीचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर व भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव सय्यद अकबर, नगरसेवक अमर पाटील, दिलीप पाटील, विकास घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

रॅलीदरम्यान शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मसमभाव व शांतीचा संदेश देऊन एकतेचे प्रतीक असलेला भारताचा तिरंगा फडकवल्याने ही रॅली परिसरात आकर्षणाचा केंद्रबंदू ठरली आहे. संपूर्ण देशात बाबरी मशीद आणि राम मंदिर निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सर्व मुस्लिम बांधव आदर करतो व आम्हाला निर्णय मान्य आहे, तसेच आम्ही सर्व हिंदू, मुस्लिम भाऊ-भाऊ आहोत. त्यामुळे प्रत्येक सण, उत्सव आम्ही शहरात एकत्रित साजरे करतो, असेही मुस्लिम बांधव म्हणाले व रॅली दरम्यान हिंदुस्थान जिंदाबाद म्हणत मुस्लिम बांधवांनी राष्ट्राविषयी प्रेमदेखील व्यक्त केले, तसेच या रॅलीदरम्यान मुस्लिम बांधवांनी झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव यासारखे अनेक सामाजिक संदेश देखील दिले व शांततेच्या मार्गाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीबाबत मुस्लिम बांधवांनी दिलेल्या शांतता-एकतेच्या संदेशाचे व रॅलीत फडकलेल्या तिरंग्याचे पनवेल परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे. या वेळी आयोजकांमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष लाबुद्दीन शेख, उपाध्यक्ष इम्रान शेख, सचिव मोहम्मद (सादिक) खान, इसरार अहमद शेख, नायब शेख, रशिद शेख, शमशाद शेख, सजाद मन्सुरी, जैनुल अबीदीन, मुमताज भाई यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply