घरातच राहण्याचे शासनाचे आवाहन
पनवेल : वार्ताहर, मोहोपाडा : प्रतिनिधी
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवून सर्वांनी घरातच रहावे, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले असतानाही अनेक शहरांसह ग्रामीण भागातून घराबाहेर पडतात तर काहीजण आपल्या गच्चीत जमून राहतात. यात सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत नाही. अशांविरोधात आता पनवेल शहर पोलिसांच्या मार्फत तसेच रसायनी पोलिसांच्या मार्फत ड्रोन कॅमेर्याची नजर राहणार आहे. तक्का गाव परिसरात नुकत्याच सापडलेल्या कोरोनाबाधित रूग्णामुळे त्याचा प्रसार परिसरात होऊ नये यासाठी तक्का गाव आणि संभाव्य गर्दी परिसरात अनावश्यक बाहेर पडणार्या व्यक्तींवर तसेच वाहनांवर ड्रोन कॅमेर्याद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्याकडून मिळाली आहे. त्याचप्रमाणे रसायनी परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरत असल्याने सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता घराबाहेर अनावश्यक पडत असतील अशांवर ड्रोन कॅमेरा फुटेजच्या आधारे व त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.