Breaking News

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत शिधावाटप; गरजू कुटुंबांना दिलासा

उरण ः प्रतिनिधी

नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबई आयुक्तालयातील गरीब, गरजू कुटुंबांबाबत माहिती गोळा करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व प्रभारी अधिकार्‍यांनी सदरची माहिती गोळा करून त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या वतीने सोमवारपासून (दि. 20) उरण शहर व परिसरातील गरीब, गरजूंना शिधावाटप करण्यात आले. राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गरीब, गरजूंची उपासमार होत असल्याने त्यांना मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने हे शिधावाटप करण्यात आले. आतापर्यंत 100 गरजूंना उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या हस्ते शिधावाटप करण्यात आले. यापुढेही शिधावाटप करण्यात येईल. शिधावाटप कीटमध्ये सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना गरीब, गरजू कुटुंबांसाठी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. उरणमधील रानसई कातकरी वाडी, इंदिरानगर झोपडपट्टी, नाईक नगर झोपडपट्टी, जेएनपीटी टाऊनशिपसमोरील झोपडपट्टी आदी ठिकाणी गरजू व्यक्तींना शिधावाटप करण्यात आले. या वेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस हवालदार सचिन केकरे व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांना काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये. त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी शिधावाटप केले आहे, असे प्रतिपादन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी या वेळी केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply