भारतीय युवा संघाचा आफ्रिकेवर सलग दुसरा विजय
लंडन : वृत्तसंस्था
वयाची 18 वर्षे पूर्ण करणारा मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू यशस्वी जैस्वालने (नाबाद 89 धावा आणि 4 बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर 19 वर्षांखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आठ गडी आणि 202 चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना डावखुरा फिरकीपटू यशस्वीच्या गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा डाव 29.5 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. जोनाथन बर्ड (25) आणि अॅण्ड्र्यू ल्यू (24) यांनी आफ्रिकेकडून कडवा प्रतिकार केला. रवी बिश्नोई आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून यशस्वीला उत्तम साथ दिली.
प्रत्युत्तरात यशस्वीने 56 चेंडूंत 14 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 89 धावांची तुफानी खेळी साकारली. कर्णधार प्रियम गर्ग (0) आणि शाश्वत रावत (2) अपयशी ठरले, पण यशस्वीने ध्रुव जुरेलसह (नाबाद 26) 94 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा विजय साकारला.