Breaking News

विरोधकांकडून शेतकर्‍यांना भडकविले जातेय : पंतप्रधान मोदी

कच्छ (गुजरात) : वृत्तसंस्था
गुजरात दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 15) कच्छ येथील कार्यक्रमात कृषी कायद्यांवर भाष्य केले. कृषी कायद्यांवरून शेतकर्‍यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. शेतकर्‍यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
दिल्लीजवळ सध्या शेतकर्‍यांना घाबरवण्याचे कारस्थान सुरू आहे. तुमच्याजवळ जर कुणी दुधासाठीचा करार करत असेल तर तो तुमच्या गायी घेऊन जातो का, असा सवाल उपस्थित करीत ज्या पद्धतीने पशूपालन व्यवसायात शेतकर्‍यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्येही आता स्वातंत्र्य येणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी संघटना या कायद्यांसाठीची मागणी करीत होते आणि आज विरोधक शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु शेतकर्‍यांचे हित ही सरकारची प्राथमिकता असून, त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. देशाच्या कानाकोपर्‍यातील शेतकरी सरकारसोबत आहे. असे असताना काही जण गैरसमज निर्माण करून शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करीत आहेत. शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. कच्छ हा जगातील सर्वात मोठा हायब्रिड एनर्जी पार्क बनणार आहे. सिंगापूर आणि बहरिनमध्ये ज्या पद्धतीने एनर्जी पार्क आहे त्या तोडीचा पार्क कच्छमध्ये तयार होतोय. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकर्‍यांना याचा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply