पंतप्रधानांनी ट्विटर हँडलवरील नाव बदलले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘चौकीदार’ हा शब्द अधोरेखित केला आहे. देशभरातील सभांमध्ये स्वतःचा ‘देश का चौकीदार’ असा उल्लेख करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आता पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरील नावात बदल करीत ते ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनीही पंतप्रधानांचे अनुकरण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर ट्विटर हँडलवरील नाव बदलल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच अध्यक्ष अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ असे विशेषण लावले आहे. या व्यतिरिक्त जेपी नड्डा, रमन सिंह, पूनम महाजन यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार जोडले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने एक व्हिडीओ लाँच केला होता. 3 मिनिटे 45 सेकंदाच्या त्या व्हिडीओमध्ये ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडीओ मुख्य होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चौर है’ असा पंतप्रधानांवर वार केल्यानंतर पंतप्रधान एकटेच चौकीदार नाहीत, असे भाजपने म्हटले होते. जो जो भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो, तो तो चौकीदार आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. मोदी यांच्या ट्विटनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ‘मैं भी चौकीदार’चा प्रयोग करीत ट्विट केले. यानंतर मैं भी चौकीदार हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला.