पेण ः प्रतिनिधी
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरेनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. पेण तालुका अधिकारी तथा वाशी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा म्हात्रे यांच्या टीमने पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना भेट दिली. पेण तालुक्यातील अंतोरे, काळेश्री, कोप्रोली, उंबर्डे या गावांना भेटी देऊन तालुक्याचा आढावा घेण्यात आला. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा म्हात्रे यांनी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित असणार्या रुग्णांची तपासणी केली. या वेळी उपस्थित आरोग्य सहाय्यक डी. बी. म्हात्रे, जी. एम. म्हात्रे, आरोग्यसेवक व्ही. डी. म्हात्रे, एम. ए. पाटील यांची टीम तालुका आरोग्य अधिकार्यांसोबत पेण तालुक्यात फिरत आहेत.
सागर शक्ती सामाजिक विकास संस्थेकडून मदत
श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील सागर शक्ती सामाजिक विकास संस्थेकडून श्रीवर्धनमधील जीवना कोळीवाडा येथील 70 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असलेल्या गरिबांचे अत्यंत हाल होत आहेत. अशा वर्गाला मदत म्हणून संस्थेने समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते. त्याला अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला. परिवर्तन सामाजिक विकास संस्था अध्यक्ष (कोल्हापूर) शिवाजी पाटील यांनी जीवनोपयोगी वस्तू दिल्या. कोरोनाच्या संकटामुळे मच्छीमार व त्यावर आधारित असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी शिवाजी पाटील यांच्या सहकार्याने 70 गोरगरीब व गरजू कुटुंबांना तांदूळ, कांदे, बटाटे, गोडेतेल, मूगडाळ, चनाडाळ, साबण, बिस्कीट पुडे, हळद आदी जीवनावश्यक वस्तू घरी नेऊन देण्यात आल्या.
दिव्यांग बांधवांना मदतीचा हात
नागोठणे ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामधंदा तसेच व्यवसाय ठप्प झाल्याने दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाकडून त्यांना काहीतरी हातभार लागावा यासाठी येथील ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात महसूल विभागाच्या वतीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शहरातील 90 दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
आदिवासीवाडीत जीवनावश्यक साहित्य
रेवदंडा ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळात शासनाने लॉकडाऊन जारी केल्याने सर्वसामान्य, गरीब, रोजदांरीवर काम करणार्यांना काम उपलब्ध नसल्याने उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने रामराजच्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या स्तुत्य उपक्रमातून अलिबाग तालुक्यातील आंबेवाडी आदिवासीवाडीत जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. रामराजच्या बँक ऑफ इंडिया शाखेने आदिवासीवाडीवर प्रत्यक्ष भेट देऊन जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. या वेळी शाखा व्यवस्थापक प्रकाश जाधव, लेखनिक वरूपा कुचना, मयुर वर्तक, उमेश लोकार, हिराजी माळी, महेश पाटील तसेच रामराजमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागोठणे ग्रामपंचायतीकडून प्रोत्साहनपर भत्ता
नागोठणे ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील ग्रामपंचायत कर्मचार्यांसह अंगणवाडी आणि आशा सेविका झटून काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची ग्रामपंचायतीने दखल घेत 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून 56 ग्रामपंचायत कर्मचारी आणि 19 सेविकांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रोहे पंचायत समिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी सरपंच प्रकाश जैन यांच्यासह उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.