पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या संकटामुळे महिला कवी, साहित्यिक एकत्र भेटू शकत नाहीत. आपली कला सादर करू शकत नाहीत, पण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कवयित्रींसाठी घेण्यात आलेले ऑनलाइन कविसंमेलन म्हणजे एक साहित्यिक पर्वणी असल्याचे उद्गार पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी काढले.
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला विशेष कविसंमेलनाचे उद्घाटन महापौर डॉ. चौतमोल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. हे ऑनलाइन कविसंमेलन महिला साहित्यिकांसाठी व्यासपीठ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या महिला विशेष कविसंमेलनाला नवीन पनवेल येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. शितला गावंड यांनी शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कविसंमेलने सुरू आहेत. त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे ही साहित्यिकांसाठी आनंदाची बाब आहे; तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्रा. एल. बी. पाटील यांनी कवींनी समाजभान ठेवले पाहिजे. सामाजिक विषय हाताळले पाहिजेत, असे मत व्यक्त करून या कविसंमेलनास शुभेच्छा दिल्या.
महिला कविसंमेलनामध्ये कवयित्री अनघा तांबोळी (नवी मुंबई) यांनी पंगत ही कविता सादर केली. प्रा. प्रज्ञा कल्याणकर (पुणे) यांनी लाजरा चंद्र ही कविता पेश केली. संध्या देवकर (रोहा) व छाया गोवारी (पनवेल) यांनी गझल सादर केली, तर योगिनी वैदू (पनवेल) यांनी आई ही कविता सादर केली.
प्रास्ताविकात ज्योत्स्ना राजपूत यांनी कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या उपक्रमांविषयी माहिती विषद केली, तसेच आतापर्यंतच्या तीन कविसंमेलनांना कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन योगिनी वैदू यांनी केले, तर आभार मंदाकिनी हांडे यांनी मानले.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper