Breaking News

आरोग्य सभापतींकडून विविध यंत्रणांशी संवाद

कर्जत ः बातमीदार

रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य तसेच शिक्षण समितीचे सभापती सुधाकर घारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जत तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी तालुक्यातील सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना करून त्यांच्याकडून समस्या ऐकून घेतल्या. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य समिती सभापती सुधाकर घारे यांनी कोरोनाचा कर्जत तालुक्यातील वाढता प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या कर्मचारीवर्गाशी संवाद साधला. कर्जत पंचायत समितीच्या कार्यालयातून सुधाकर घारे यांनी तालुक्यातील सर्व 52 ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्‍यांसह फिल्डवर काम करणारे जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखाशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या साहाय्याने संवाद साधला. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे आदी उपस्थित होते. सर्वांनी कोरोनाबाबत दक्षता पाळावी, तसेच ग्रामपंचायत स्तरावर सर्व कोरोना नियंत्रित कक्ष समित्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. शाळेतील सर्व शिक्षकांनी गावातच थांबून जनजागृती करावी. गटविकास अधिकार्‍यांनी कर्मचारीवर्गाकडून महत्त्वपूर्ण कामे करून घ्यावीत, असे आदेश त्यांनी दिले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply