Breaking News

सपोआ. विनोद चव्हाण यांचा तपासास नकार

कर्नाळा बँकेतील करोडोंच्या गैरव्यवहारांचा तपास आता वपोनि. विजय वाघमारेंकडे

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत झालेल्या करोडोंच्या गैरव्यवहाराची चौकशी आता सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद बाबू चव्हाण यांच्याऐवजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. वाघमारे हे नवी मुंबईच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.
मुंबईच्या लोहमार्ग विभागातून नुकतीच नवी मुंबईत बदली झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद बाबू चव्हाण यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिला जाणार असल्याची चर्चा होती, मात्र स. पो. आ. विनोद चव्हाण यांनीच हा तपास माझ्याकडे नको, असे त्यांच्या वरिष्ठांना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते. त्यामुळे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या तपासाची संपूर्ण स्वतंत्र जबाबदारी वपोनि. वाघमारे यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील करोडोंच्या गैरव्यवहारामुळे बँकेचे प्रामाणिक खातेदार, कर्जदार, सहकारी आणि सरकारी संस्था, पनवेल-उरण आणि परिसरातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. या सर्वांना न्याय देण्यासाठी पारदर्शक तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे या तपासात आता कशी कशी प्रगती होते याकडे पनवेलकरांचे लक्ष लागून राहणार आहे तसेच या चौकशीत आणखी कोणकोणते राजकीय नेते उघडे पडणार आहेत, हेही लवकरच स्पष्ट होईल. त्यामुळे आता ही
चौकशी कोणत्या पद्धतीने पुढे सरकणार याकडे पनवेलकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply