17 गावे आणि 59 वाड्यांना टँकरची प्रतीक्षा
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुका पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करून तालुक्यातील 17 गावे आणि 59 वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत, मात्र या कृती समितीचे काम कोरोनामुळे झालेले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील लोकांचे लक्ष शासकीय टँकरकडे लागून राहिले आहे.
कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका असून, भौगोलिक रचनेमुळे उन्हाळा सुरू झाला की पाण्याची समस्या निर्माण करीत असतो. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक हे दुर्गम भागात राहातात. दरवर्षी त्यांना पाणीटंचाईच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागातील लोकांना उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरविण्याची वेळ शासनावर येत असते.
मागील वर्षी 50हुन अधिक गावे आणि आदिवासी वाड्यांना शासकीय टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात आले होते. यंदाच्या आराखड्यात तालुक्यातील 17 गावे आणि 59 वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. या सर्व 76 गाव-वाड्यांना शासकीय टँकरच्या माध्यमातून मार्च ते मे या कालावधीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. त्यासाठी 68 लाख रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. त्याचवेळी पाणीटंचाई निवारण कृती समितीने तालुक्यातील काही नादुरुस्त नळपाणी योजनांची दुरुस्ती करण्याचे ठरविले असून, जास्त पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी विंधण विहिरी खोदल्या जाणार आहेत. ज्या विंधध विहिरी नादुरुस्त आहेत, त्यांचीदेखील दुरुस्ती केली जाणार आहे, तर विहिरींच्या दुरुस्तीचे प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आले आहेत.
पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील 17 गावांत टँकरने पाणी पुरविले जाणार आहेत. त्यात मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, भूातिवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, अंथरट वरेडी, चेवणे, मोहोपाडा, भोपळेवाडी, नांदगाव, ढाक, तुंगी, पेठ, अंथरट निड या गावांचा समावेश आहे.दुसरीकडे तालुक्यातील 58 वाड्या या पाणीटंचाईग्रस्त असून, त्यात आनंदवाडी, भगताचीवाडी, भक्ताचीवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभुळवाडी, बांगरवाडी, पेटरवाडी, काटेवाडी, चाफेवाडी, मोरेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, पाली धनगर वाडा, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, कळंब बोरीचीवाडी, भूतिवलीवाडी, धामणदांड, चिंचवाडी, मिरचुलवाडी, काळेवाडी, आसलवाडी, नाण्यांचा माळ, ताडवाडी, बनाचीवाडी, आषाणे ठाकूरवाडी, जांभूळवाडी वारे, सुतारपाडा, भागूचीवाडी, भागूचीवाडी-2, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, विकासवाडी, ठोंबरवाडी, हर्याचीवाडी, गरुडपाडा, विठ्ठलवाडी, मेंगाळवाडी, तेलंग वाडी, कोतवालवाडी, ढाक कळकराई, मिरचोली, माणगाव ठाकूरवाडी खांडपे, स्टेशन ठाकूरवाडी, नवसुचीवाडी, वारे जांभूळवाडी, खाडेपाडा आदिवासी वाडी, चहुचीवाडी, मिरचोलवाडी, नारळेवाडी, मेंगाळवाडी ठाकूरवाडी, नांदगाव विठ्ठल वाडी, दामत कातकरवाडी यांचा समावेश आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी मार्चपासून होणार होती, मात्र एप्रिल महिना संपायला आला असतानाही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.