पाली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्च पासून शाळा बंद झाल्या. परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. त्यातच टाळेबंदीची मुदत वाढत आहे हे पहाता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ऑनलाइन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू झाला. त्यानुसार सुधागड तालुक्यातील राजिप नेणवली शाळेत देखील ऑनलाइन अभ्यासमाला सुरु झाली आहे. त्यामुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे.
सुधागड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक केंद्रातील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अभ्यासमालेची माहिती देण्यात आली. तसेच गट साधन केंद्र विषय सहाय्यक यांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेचे पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. आणि त्यातून ऑनलाइन स्टडी नेणवली हा पालक ग्रुप तयार करण्यात आला. विषय सहाय्यक प्रविणा खैरे व केंद्रप्रमुक रमेश रोहेकर यांच्या मार्गदर्शनाने हा ऑनलाइन स्टडी ग्रुप कार्यान्वित झाला. या गटात विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अँड्रॉइड मोबाइलवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासमाला दररोज पाठविण्यात येते. तसेच तालुक्यातील प्रत्येक केंद्रनिहाय अभ्यासमाला पालक व विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचले का हे पाहण्यासाठी विषय सहाय्यक ग्रुप मध्ये लक्ष देत आहेत. केंद्र आतोणे करीत अशोक तुरे हे काम पाहत आहेत.
विविध लिंकद्वारे मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान तसेच वैज्ञानिक गोष्टी व व्हिडिओ असा अभ्यास आम्हाला सुट्टीत करायला मिळतोय. हे सर्व नवीन आणि मस्त वाटत आहे.
– मनस्वी कोंडे, इयत्ता 6 वी
नेणवलीच्या पालक व विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन अभ्यासमालेस दिलेला प्रतिसाद खूप छान आहे. त्यामुळे मला पुढील शिक्षणात नवीन तंत्रज्ञान वापरास व प्रयोग करण्यास प्रोत्साहित करत आहेत.
– राजेंद्र अंबिके, उपशिक्षक, नेणवली