पोलादपूर : प्रतिनिधी – गेल्या गुढीपाडव्यासह रविवारचा अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त चुकल्याने वाहनखरेदी करण्यासाठी अनेक मध्यमवर्गीयांसह श्रमजीवींनी केलेल्या कोटयवधी रूपयांच्या गुंतवणुकीबाबत लॉकडाऊनमधून कोणताही पर्याय निघाला नसल्याने या गुंतवणुकीसह गुंतवणुकदारांचेही भवितव्य अंधारात आले आहे.
हे दोन्ही मुहूर्त टळल्यानंतरही वाहन खरेदीबाबतच्या कोणत्याही व्यवसाय आस्थापनांना लॉकडाऊनमधून मुभा न मिळाल्याने वर्क फ्रॉम होम करणार्या या आस्थापनांकडून ग्राहकांना केवळ इमेलवर प्रतिक्षा करीत असल्याबद्दल धन्यवाद दिले जात असल्याचे अनुभव येत आहेत. ज्यांच्याकडे मोबाइल सुविधा आहेत त्यांना थेट संपर्क साधण्यासाठीदेखील तसदी संबंधितांकडून घेतली जात नसल्याने या वाहनविक्री आस्थापनांकडून ग्राहकसेवेबाबत अक्षम्य दिरंगाई केली जात असल्याचे नवीन ग्राहकांचे म्हणणे आहे.
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया देखील खरेदी मुहूर्ताचा मानला जातो. मात्र, वाहनखरेदी, सोनेखरेदी व वास्तुखरेदीची तयारी करणार्यांना अचानक पब्लीक कर्फ्यू आणि लागोपाठ लॉकडाऊनचा आदेश झाल्यानंतर गुढीपाडव्याला सोनेविक्रीची दुकानं आणि बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सची ऑफिसेस बंद होती. मात्र, वाहनखरेदी करणार्यांनी त्यांच्या मार्केटींग रिप्रेझेन्टेटिव्हजमार्फत टू व्हिलर्स, थ्री व्हिलर आणि फोर व्हिलर्सच्या ग्राहकांकडून कर्ज व रोख रक्कमेच्या माध्यमातून वाहनांची संपूर्ण रक्कम प्राप्त केली असतानाही अचानक जाहिर झालेल्या लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम ची भुमिका स्विकारली.
रायगड जिल्ह्यातील सर्वात आधी कोरोना बाधित क्षेत्र पनवेल परिसरात असताना खारघर, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतील डिस्ट्रीब्युटर्सची शोरूम शटरडाऊन केली गेली होती. रायगड जिल्हयातील शोरूमदेखील बंद झाल्यानंतर ग्राहकांसोबत संपर्क साधणे या काळात बंद झाले. अनेक ग्राहकांची जुनी चालु स्थितीतील वापरती वाहने घेऊन नवीन वाहन खरेदीमध्ये डिस्काऊंट देण्याची ऑफर असल्याने काहींनी त्यांच्या हातातील वाहने संबंधित डिस्ट्रीब्युटर्सना देऊन डिस्काऊंट मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता नवीन वाहन दीड महिना मिळाले नसताना जुन्या वाहनाचा धंदाही बुडाला आणि नवीन वाहनाचा हप्ता व व्याज डोक्यावर बसले,अशी अडचणीची स्थिती निर्माण झाल्याने आर्थिक संकट सर्वसामान्य ग्राहकांवर
घोंगावू लागले आहे.
…तर आर्थिक फसवणुकीची शक्यता
रायगड जिल्ह्यातील असंख्य टू व्हिलर, थ्री व्हिलर आणि फोर व्हिलर खरेदी करू इच्छिणार्यांना या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 20 एप्रिलनंतर कोणतेही धोरण आखलेले दिसून येत नाही. नजिकच्या काळात महाराष्ट्र सरकारने तातडीने वाहनांची डिलीव्हरी करण्यासाठी संबंधित डिस्ट्रीब्युटर आणि डिलरशिपला परवानगी न दिल्यास काही डिलरशिपने परस्पर गाशा गुंडाळल्यास मोठया प्रमाणात ग्राहकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.