Breaking News

माणगाव तालुक्यातील तिलोरे येथील शेततळ्यात आढळली भलीमोठी मगर

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील तिलोरे येथे श्री. कासे यांचे शेततळे असून ते त्या तळ्यात मत्स्य व्यवसाय करतात. शेततळ्यात मगर शिरली असल्याचे काही दिवसांपुर्वी त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब माणगाव वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मगर तळ्यात असल्याची खात्री केली. त्या बाबतचा पंचनामाही श्री. वाघमारे यांनी  केला. मात्र मगर पकडणारी रेस्क्यू टीम उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, गोरेगाव येथील सर्पमित्र तुषार साळवी त्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सुमारे चार तास प्रयत्न करून मगरीला पकडले व वनखात्याच्या ताब्यात दिले. ही मगर एक मीटर लांबीची असल्याचे वनखात्याच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. वनखात्यामार्फत या मगरीला गोरेगावच्या खाडीत सुरक्षितपणे सोडण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकावर मगरीचा हल्ला

महाड : प्रतिनिधी

तालुक्यांतील गोमेडी ताडवाडी येथील महादेव पातेरे (वय 75) यांच्यावर सावित्री नदीतील मगरीने रविवारी पहाटे हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या  महाड ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले. महादेव पातेरे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी रविवारी पहाटे सावित्री नदी परिसरात  गेले होते. गुरे नदीच्या पलिकडे जाऊ नयेत, यासाठी पातेरे नदीपात्रांमध्ये उतरुन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यात  त्यांचा पाय पाण्यात असलेल्या मगरीवर पडला आणि मगरीने त्यांच्या डाव्या पायावर हल्ला केला. प्रसंगावधान दाखवून  पातेरे त्वरीत नदीच्या बाहेर आले. त्यांना त्वरीत चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचाराकरीता महाड ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply