रेवदंडा ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात बंदोबस्त व गस्तीसाठी शाळाशाळांतील आरएसपी शिक्षकसुध्दा पोलिसांसह रस्तोरस्ती ऑन ड्युटी दिसत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार आरएसपी शिक्षकही देशासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत नाका, चेक पोस्टवर कर्तव्य बजावत आहेत.
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत रायगड जिल्हा आरएसपी सल्लागार दीपक मोकल, रायगड जिल्हा अतिरिक्त समोदशक किशोर राठोड, उपसमोदशक आर. डी. नाईक, पथक अधिकारी आर. डी. म्हात्रे हे पोलीस उपनिरीक्षक हर्षल हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पारनाका, चौलनाका आदी ठिकाणी बंदोबस्तासाठी ऑन ड्युटी कर्तव्य बजावत आहेत. आरएसपी शिक्षक सेवा बजावणारे दीपक मोकल हे को.ए.सो.चे माजी मुख्याध्यापक-शिक्षक आहेत, तर आरएसपी शिक्षक किशोर राठोड, आरएसपी शिक्षक आर. डी. नाईक, आरएसपी शिक्षक आर. डी. म्हात्रे हे को.ए.सो.च्या विविध शाळांवर आरएसपी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या सुरक्षेसाठी सर्वांनी घरातच राहावे, असे आवाहन करतानाच यानिमित्त पोलिसांसह बंदोबस्त करताना देशसेवेची संधी प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया माजी मुख्याध्यापक आरएसपी शिक्षक व जिल्हा आरएसपी सल्लागार दीपक मोकल यांनी व्यक्त केली.