
महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात भितीचे वातावरण असतानाच याबाबत कुठलेही गांभिर्याचे भान नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकार्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात वाढदिवसाची पार्टी केली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता या प्रकरणी कोणी फिर्याद दिली नसल्या कारणाने गुन्हा दाखल केला गेला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक शैलेश सनस यांनी दिली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा वाढदिवस बुधवारी पंचायत समिती कार्यालयात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंचायत समितीच्या सभागृहात तसेच सभापतींच्या दालनामध्ये मेजवानीची पंगत झाली. या प्रकरणी महाडमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे शासनाची महसुल, पोलीस, आरोग्य यंत्रणा चोवीस तास कोरोनाशी सक्रियपणे लढा देत असतानाच दुसरीकडे पंचायत समितीच्या सभापती तसेच अन्य पदाधिकारी आणि अधिकार्यांनी मात्र अशाप्रकारे मटणाच्या पार्टीला हजेरी लावल्याने महाडमधील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.