Breaking News

कनिष्ठ विस्तार अधिकार्‍यांची पदे 31 डिसेंबरपूर्वी भरणार

शिक्षक समन्वय समितीला शिक्षणाधिकार्‍यांचे आश्वासन

सेवानिवृत्तीनंतरचे लाभ निवृत्तीच्या दिवशीच मिळणार
अलिबाग, माणगाव : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागातील कनिष्ठ विस्तार अधिकार्‍यांची तब्बल 32 पदे आजही रिक्त आहेत. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. ही बाब लक्षात घेवून ही पदे तातडीने भरण्यात यावीत असा आग्रह शिक्षक समन्वय समितीने धरला आहे. त्याला प्रतिसाद देत ही पदे 31 डिसेंबर पूर्वी पदोन्नतीने भरली जातील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिले आहे. सेवा निवृत्त शिक्षकांना निवृत्तीनंतरचे लाभ तातडीने मिळण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालयातील शिक्षणाधिकारी यांच्या दालनात शिक्षक समन्वय समितीची बैठक सोमवारी (दि. 12) पार पडली. या वेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. स्थायी प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2022 अखेर ज्यांचे प्रस्ताव परिपूर्ण आहेत, त्या सर्व शिक्षकांना आदेश देण्यात येतील. प्रस्ताव तपासणी कार्यवाही सुरू आहे. वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव 31 जानेवारी 2023 अखेर पूर्ण निकाली काढण्यात येतील, फंड प्रकरण मंजूरी यासाठी नवीन लेखनिकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
निवड वेतनश्रेणीसाठी ज्या पदवीधर शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झालेले नाहीत, त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषद कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून निवडश्रेणी विषय मार्गी लावता येईल, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 1 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुख 50 टक्के पदे पदोन्नतीने भरण्यासंदर्भात चर्चा करत असताना 228 पदे मंजूर आहेत. आज 78 केंद्र प्रमुख कार्यरत आहेत कनिष्ठ विस्तार अधिकारी पदे भरल्याने अधिक केंद्रप्रमुख पदे निर्माण होणार आहेत यासाठी पंचायत समितीकडून सेवा ज्येष्ठता यादी सादर करून प्रस्ताव तातडीने मागविण्यात यावेत, अशी सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी केली.
सेवानिवृत्तीच्या दिवशी शिक्षकांना मिळणारे उपदान रक्कम, जिल्हा परिषद फंड रक्कम, गटविमा रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळावी, यासाठी जून 2023 अखेर सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांची यादी तयार करण्यात यावी, हेदेखील या बैठकीत ठरले. सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांना एनओसीसाठी ज्या तालुक्यांमध्ये सेवा केली, त्याठिकाणची एनओसी घ्यावी लागते. यासाठी शिक्षकाची बदली होताना सेवापुस्तकांमध्ये नोंद करण्यात यावी म्हणजे त्यांना पंचायत समितीमध्ये जावे लागणार नाही, यावर चर्चा करण्यात आली. यासाठी शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ सहमती दर्शवली आहे. सन 2021 च्या महापुरामध्ये नुकसान झाले आहे, अशी सेवा पुस्तके दुय्यम करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, अखिल दोंदे संघटनेचे जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य प्रतिनिधी लियाकत राऊत, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधिर पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह गजानन देवकर, जुनी पेन्शन संघटनेचे सचिन जाधव, महाड तालुका अध्यक्ष भिकाजी मांढरे, नितेश पाटील (अलिबाग), प्रविण पाटील (पेण), निलेश तुरे (अलिबाग), जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी गुबनरे आदि पदाधिकारी सोमवारी झालेल्या बैठकीला
उपस्थित होते.

Check Also

खासदार धैर्यशील पाटील विश्वास सार्थ ठरवतील -मंत्री रवींद्र चव्हाण

पेण ः प्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांनी कार्यकर्त्यासाठी सांगितलेली तत्वे म्हणजे त्याच्या पायात भिंगरी असली पाहिजे, …

Leave a Reply