परतीच्या वाटा झाल्या बंद; पशू-प्राण्यांना जगवण्याचेही आव्हान

पाली : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेल्या टाळेबंदीत अनेक जण जागीच अडकून पडले आहेत. पाली सुधागड तालुक्यात जागोजागी मेंढपाळ अडकून पडलेत. टाळेबंदीचा फटका घाटमाथ्यावरून रायगड जिल्ह्यासह संबंध कोकणात पसरलेल्या मेंढपाळ यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सर्वत्र बंद असल्याने व सोबत आणलेले पैसे संपल्याने आता पुढे जगावे कसे हा प्रश्न मेंढपाळांना सतावतोय. कोरोनाच्या राष्ट्रीय संकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीनंतर देशभरामध्ये सर्वसामान्य आणि श्रमजिवी तसेच गरीबांच्या आयुष्यावर प्रचंड परिणाम झालेला दिसून येत आहे. धनगर बांधव दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात कोकणात दाखल होतात. कोकणात शेळ्या मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही सुरू आहे. लेंडीखताला मोठी मागणी असते. शेळ्या मेंढ्यांचे मलमूत्र जमीन सुपीक करून पीक उत्पादकता वाढवण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे दरवर्षी मेंढपाळ पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात दाखल होतात. प्रत्येक मेंढपाळाच्या कळपात 200 ते 250 शेळ्या मेंढ्या असतात. या मेंढ्या शेतात बसून शेतकर्यांकडून धान्य व बिदागी घेत असतात. यावर्षी मात्र परिस्तिती पूर्णतः बदलून गेली आहे. अवकाळी पाऊस व चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका या मेंढपाळ वर्गाला बसतोय. कोरोनाच्या महामारीत मेंढपाळ वर्गावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांच्याबरोबर असलेल्या पशु प्राण्यांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. पशु प्राण्यांना जगवावे कसे, असा प्रश्न या घडीला त्यांना सतावतोय.
आम्ही नेहमीप्रमाणे घर सोडले. शेळ्या, मेंढ्या, घोडे, कुत्रे, कोंबड्या यांच्या तांड्यासह आम्ही घाट माथ्यावरून खाली उतरलो, मात्र अचानक लॉकडाऊन झाल्याने अनेक अडचणी आमच्यासमोर उभ्या राहिल्या. सततची भटकंती असल्याने भीतीपोटी कोणी शेतकरी आमच्याजवळ येत नाहीत. आजपर्यंत आमच्यापर्यंत कोणतीही अन्नधान्य अथवा जीवनावश्यक साहित्य पोहचले नाही. सतत पाऊस पडतोय, त्यामुळे शेतात उघड्यावर राहणे कठीण झाले आहे. एक दोघेजण असतो तर कुठेही राहून दिवस काढले असते. परंतु पशु प्राण्यांना घेऊन कुठे जावे. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे.
-मेंढपाळ