रायगडातील एकूण आकडा शंभरीपार
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 1) तब्बल 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे. या रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटिव्ह झालेल्यांच्या घरातील आठ जणांचा समावेश असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांची मुंबईला जाणार्यांची राहण्याची सोय कामाच्या ठिकाणीच करावी, ही मागणी योग्य असल्याचे दिसून आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे आता 82 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. ग्रामीणमध्येही एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील रुग्णसंख्या 93 झाली असून रायगडचा एकूण आकडा 110वर पोहचला आहे.
शुक्रवारच्या पॉझिटिव्हमध्ये चार कामोठे, चार नवीन पनवेल, दोन खारघर आणि कळंबोलीमध्ये दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीणमध्येही एक रुग्ण आढळला आहे. यामध्ये पूर्वीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या घरातील आठ जणांचा समावेश आहे, तर तिघांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याची शक्यता आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठ्यात चार रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यापैकी एक सेक्टर 21मधील पोलीस कर्मचारी असून तो मुंबईला कार्यरत होता. सेक्टर 10मधील 21 आणि 13 वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून त्यांची आई मुंबई महापालिकेत सफाई कामगार आहे. ती यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आहे. सेक्टर 9मधील 34 वर्षीय व्यक्ती मुंबईला सायन हॉस्पिटलमध्ये एमआरआय टेक्निशियन आहे. त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याची शक्यता आहे.
नवीन पनवेल सेक्टर 13मधील मुंबई पोलीस दलातील कर्मचार्याच्या घरातील दोन मुली आणि आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या पोलिसाचा रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह होता. त्यामुळे त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. खारघर ओवे सेक्टर 35मधील 22 वर्षीय व्यक्ती मॅजिस्टिक ग्रुप ऑफ कंपनीज कोपरखैरणे येथे कामाला असून त्याच्या कार्यालयप्रमुख आणि कुटुंबातील तीन सदस्यांना कोरोना झाला होता. खारघर स्वप्नपूर्तीमधील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. कळंबोली येथील पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिसाच्या घरातील आई आणि मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
शुक्रवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 953 जणांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी 92 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत. कोरोना पॉझिटिव्हपैकी 51 जणांवर उपचार सुरू असून 28 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.