संजयआप्पा ढवळे यांचे आवाहन
माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना विषाणूचे लोण महाराष्ट्रात वेगाने फैलावत असून मुंबई, पुण्यापाठोपाठ रायगडमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी 3 मेपासून लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. या भीषण परिस्थितीत लोकांचे उद्योगधंदे बंद पडून रोजंदारीवर काम करणार्या लोकांच्या हाती पैसा नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे माणगाव तालुक्यातील किराणा माल दुकानांसोबतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्या अन्य दुकानदारांनी या भीषण संकटात वस्तूंची चढ्या दराने विक्री करू नये, असे आवाहन माणगाव भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संजयआप्पा ढवळे यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखीन काही महिने जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना माणसी पाच किलो तांदूळ एप्रिल ते जूनपर्यंत मोफत मिळणार आहेत, तसेच केशरी कार्डधारकांना मे ते जून या दोन महिन्यांत 12 रुपये किलो दराने तांदूळ व आठ रुपये किलो दराने गहू मिळणार आहेत. या अन्नधान्याबरोबरच जेवणासाठी लागणारे इतर सामान लोकांना बाजारातून आणावे लागत आहे. या सर्व लोकांची दुकानदारांनी पिळवणूक न करता रायगड जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी किराणा मालाचे जे दरपत्रक जाहीर केले, त्याचप्रमाणे विक्री करावी, शिवाय त्या दरपत्रकाचे फलक आपल्या दुकानासमोर लावावेत.
सरकारने दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे सर्वांनी पालन करावे. दुकानदारांनी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना गर्दी करू देऊ नये. जाहीर केलेल्या दरपत्रकाप्रमाणेच किराणा सामानाची विक्री किराणा दुकानदारांनी करावी.तसेच इतर दुकानदारांनीही याकडे लक्ष देऊन कोरोनाच्या संकटात कोणाची पिळवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही माणगाव भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे.