Breaking News

सिडको वसविणार तिसरी मुंबई

40 गावांमधील जमीन संपादनाचे आदेश; निवडणुकीनंतर होणार कार्यवाही

बेलापूर : रामप्रहर वृत्त : पनवेलपासून शंभर किलोमीटर लांब माणगावमधील कुंडलिका नदीच्या तीरावर वसविण्यात येणार्‍या तिसर्‍या मुंबईच्या जमीन संपादनाला लोकसभा निवडणुकीनंतर प्रारंभ होणार आहे. रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून ही जमीन संपादन केली जाणार असून सिडको यात समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे. मुंबईला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबईला पर्याय म्हणून 19 हजार हेक्टर क्षेत्रफळावर आता तिसरी मुंबई निर्माण केली जाणार आहे.

राज्य शासनाने रायगड जिल्ह्यातील रोहा, म्हसळा, श्रीवर्धन आणि अलिबाग या चार तालुक्यांतील 40 गावांमधील जमीन संपादन करण्याचे आदेश जारी केले आहेत. मुंबईला पर्याय म्हणून 49 वर्षांपूर्वी नवी मुंबई निर्माण केली गेली असून नवी मुंबईची क्षमता संपल्यामुळे आता नदी व समुद्रकिनारी तिसर्‍या मुंबईची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. यासाठी सिडको जमीन संपादनासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडणार असून त्यासाठी आठ अधिकारी व कर्मचार्‍यांचा एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. मात्र याच काळात लागलेल्या निवडणुकीमुळे हे अधिकारी निवडणूक कामात अडकून पडले आहेत. त्यामुळे जमीन संपादनाची ही प्रक्रिया मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिसरी मुंबई निर्माण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून सिडको या प्रकल्पात समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे. रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून हे जमीन संपादन केले जाणार असून निवडणूक प्रक्रियेमुळे सर्व अधिकारी कर्मचारी व्यस्त झाले आहेत. आता निवडणुकीनंतरच या कामाला गती येण्याची शक्यता आहे.

-अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

कुंडलिकेच्या तीरावर नागरी वसाहत

दुथडी भरून वाहणार्‍या कुंडलिका नदीच्या किनार्‍यावर 19 हजार 147 हेक्टर जमिनीवर ही नागरी वसाहत उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नदीचा वापर जलवाहतुकीसाठी केला जाणार असून अलिबाग तालुक्याच्या सहभागामुळे सागरी वाहतूक देखील या नवनगरीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply