खारघर टोलनाका येथील घटना
पनवेल : वार्ताहर : शुक्रवारी मध्यरात्री 12:10 च्या सुमारास ऑईल घेऊन जाणार्या ट्रकचालकाची मद्यधुंद अवस्था पाहून टोलनाक्यावरील कर्मचार्यांनी ट्रक बाजूला लावण्याबाबत समजावत असताना, मद्यधुंद ट्रकचालकाने कसलाही विचार न करता समोर उभ्या असलेल्या कर्मचार्यांमधून तडक निघण्याचा प्रयत्न केला, मात्र या वेळी येथील सुपरवायझर असलेल्या एकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना घडली आहे, तसेच या ठिकाणी अन्य एक जण जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने ऑईल घेऊन जाणारा ट्रक (एमएच-46-बीबी-4436) हा घेऊन ट्रकचालक शिवप्रकाश सरज (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा चालला असताना खारघर टोलनाक्याजवळ आला असता येथील कर्मचार्यांना तो मद्यधुंद अवस्थेत असलेला आढळून आला. या वेळी सर्वच कर्मचार्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत तो नसल्यामुळे
समोर टोलनाक्यावरील कर्मचारी उभे आहेत याचा कसलाही विचार न करता तडक आपल्या ताब्यातील ट्रक बेदरकारपणे घेऊन निघून गेला, मात्र या वेळी येथील सुपरवाझर असलेला प्रकाश जोशी (38) यांच्या अंगावरून सदर ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गोरख पाटील (30) हा जखमी झाला आहे. या वेळी दोघांना उडवून तो पसार होण्याच्या नादात येथील बॅरिगेटला धडक देत एका टेम्पोलाही धडकला. तरीही तो थांबला नाही. या वेळी धडक बसलेल्या टेम्पोने त्याला नेरूळ येथे अडविले असता ट्रकवरील चालक पसार होण्यात यशस्वी झाला, मात्र ट्रकवरील क्लिनर आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून ट्रकचालक मात्र फरारी झालेला आहे. सदर ऑईल ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल असून, सदरबाबत खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ अधिक तपास करीत आहेत.